Ad will apear here
Next
मुडी...!
मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून बियाण्यासाठीच्या धान्याची नैसर्गिकरीत्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. आमच्या प्रांतात (सिंधुदुर्गात) त्याला ‘बिवळो’ असंही म्हणत. आमच्या बालपणीच्या काळात कोकणातल्या प्रत्येक घरात धान्याच्या अशा मुड्या एकावर एक रचून ठेवलेल्या दिसत. 

माझा बाबा अशा भोपळ्याच्या आकाराच्या मस्त गोल मुड्या बनवत असे. आमच्या गावात घराघरातून अशा गवताच्या मुड्या बांधल्या जात असत; पण माझ्या बाबाला अशा मुड्या बांधण्याचं चांगलं कसब होतं. बालपणीची खूप वर्षं मी अशा मुड्या पाहिल्या; पण एकाही वर्षी अशा मुडीतलं बियाण्यासाठीचं धान्य खराब झालेलं कधी पाहिलं नाही. त्या काळात खरिपाच्या सुरुवातीला बाजारातली आताच्या सारखी पिशवीबंद बियाणी विकत आणण्याची प्रथा नव्हतीच. शेतकरी वर्षभरासाठी लागणारं धान्य आणि मिरगात पेरायचं बियाचं धान्य अशा मुड्यांमध्ये ठेवत असत. 

बऱ्याच वेळा बाबा ही गवताची मुडी कशी बांधतो ते मी मन लावून बघत असे. पुढे बाबाचं अनुकरण करत मी सुद्धा छोट्या छोट्या मुड्या बांधत असे; पण बाबा बांधायचा तशा आखीव व रेखीव मुड्या मला कधी जमल्या नाहीत. 

आमच्या घरातल्या बियाच्या भाताच्या, भुईमुगाच्या व नाचणीच्या मुड्या बांधून झाल्यावर बाबाला मुड्या बांधण्यासाठी खूप ठिकाणी बोलावणं असे. बहुतेक वेळा बाबा मला त्याच्यासोबत घेऊन जात असे. बाबा मुड्या बांधत असताना प्रत्येक घरात माझे खूप लाड होत. खूप ठिकाणी भिजवलेले पोहे, पिठाचे लाडू असा खाऊही मिळे.

त्या काळात आजच्या सारखी बियाणी बाजारातही नव्हती. ‘वालय’ आणि ‘बेळणा’ ह्या भाताच्या पारंपरिक जाती खूप लोकप्रिय होत्या. ह्या दोन्ही जाती ‘महान’ प्रकारातल्या होत्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या. या जातीच्या भाताच्या पाच पायली, दहा पायली, एक मण, दीड मण अशा प्रमाणात मुड्या बांधत असत. साधारणपणे एक मणापासून पुढची मुडी बांधण्यासाठी खूप ताकद लागत असे. एखाद्या मुडीतलं भात दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहिलेलं मी पाहिलं आहे. 

आता अशा घरगुती मुड्या कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही. दीड-दोन खंडी भात पिकवणारा शेतकरी आज ‘मोठा’ शेतकरी समजला जातो. याशिवाय गावोगावी भात भरडण्याच्या मोठमोठ्या गिरण्या उपलब्ध असल्याने धान्याची साठवणही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या नि उपभोगलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. आज अचानक खूप पूर्वी पाहिलेल्या मुडीचं चित्र डोळ्यांसमोर आलं आणि हे ‘मुडी आख्यान’ कागदावर उतरलं.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली. 
मोबाइल : ९४२१७ ९५९५५

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVLCG
Similar Posts
‘पथदर्शी’ त्या काळच्या मागास मानल्या जाणाऱ्या अनेक जाती-जमातीतील समाज धुरिणांनी स्वतः शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवलं, जगाचा अनुभव घेतला, आणि या सर्वांचं महत्त्व लक्षात आल्यावर आपल्या समाजातील लोकांना विद्या, मती, नीती, गती, वित्त अशा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याच संदर्भाने एका समाजातील
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
‘तांबट’ पक्ष्याचा फराळ! घराच्या आवारातल्या उंबराच्या झाडावर फळांचा आस्वाद घेणाऱ्या तांबट पक्ष्याच्या जोडीचे अचानक दर्शन झाल्यावर आलेल्या सुखद पर्यावरणीय अनुभूतीचे धीरज वाटेकर यांनी केलेले हे वर्णन...
खळ्यातले आपटबार... आता कोणी खळी करत नाहीत किंवा नाचणीही पिकवत नाहीत. क्वचित कुठे तरी खळी चोपण्याचे किंवा नाचणी झोडण्याचे आवाज कानांवर पडतात; पण त्या आवाजांत तो पूर्वीचा फेरही नाही आणि नादही नाही. जग आज खूप पुढे गेलं असलं आणि मानवी हातांची जागा यंत्रांनी घेतली असली, तरी बालपणीच्या अशी आठवणींनी काही क्षणापुरतं का होईना,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language